Type Here to Get Search Results !

*समाजातील विसंगती अचूकपणे टिपण्याची ताकद व्यंगचित्रात*व्यंगचित्र दिन विशेष


            
गणेश रांगणकर वणी :
         व्यंगचित्र आणि चित्रकला यामध्ये मूलभूत फरक कोणता असेल तर तो आहे विचारांचा. चित्रकार कोणतेही चित्र रेखाटताना त्यातील सौंदर्य स्थळाचा शोध घेईल. या उलट व्यंगचित्रकार त्यातील विसंगतीचा प्राधान्याने विचार करील. रंग हा चित्रकलेचा आत्मा आहे तर विसंगती हा व्यंगचित्राचा आत्मा असे असले तरीही व्यंगचित्रातून काव्यात्म आशय, सर्वकालीन सत्य समर्थपणे चितारता येतात. थोडक्यात व्यंगचित्र काढणे वाटते तितके सोपे नाही. भरपूर वाचन, निरीक्षण, चिंतन, त्याचबरोबर कल्पनाशक्ती, विनोद बुद्धी आणि रेषांची जोड असल्याशिवाय व्यंगचित्र रेखाटण्याची कल्पनाच करणे चुकीचे आहे.
          समाजातील विसंगती अचूकपणे टिपण्याची ताकद व्यंगचित्रात आहे. वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणारी काही व्यंगचिञे ही तात्कालिक असली तरीही त्या त्या काळातील एकूणच समाज जीवनाचे त्यातील आंतरविरोधाचे, संघर्षाचे दर्शन त्यातून होत असते. व्यंगचित्राला विषयाचे बंधन नसते, अंत नसतो. आजच्या काळात माहिती तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया, सेल्फी, अंतराळ संशोधन अशा नवनवीन विषयासह कौटुंबिक, अंधश्रद्धा निर्मूलन, पाणीटंचाई, कृषी समस्या, सतत वाढती महागाई, वाढती लोकसंख्या, टंचाई, दुष्काळ, व्यसनाधीनता, मोबाईलचे वेड, राजकीय ढोंगबाजी, भ्रष्टाचार, सरकारी कामातील दिरंगाई, खड्डेमुय रस्ते, संप, मोर्चा अशा एक ना एक अनेक विषयावर रोजच्या रोज व्यंगचित्रे रेखाटता येतील.
            व्यंगचित्र ही पाहताक्षणी हसविणारे व त्यासोबतच उपरोधिक मार्मिक भाष्य जाणवून देणारे असते. व्यंगचित्र सभोवतालच्या जीवनातील घडामोडीतील विसंगती  नेमकी टिपून त्यावर भाष्य करते. समाजातील रूढी, अपप्रवृत्ती ,वागण्यातील विसंगती, भ्रष्टाचार ,महागाई तसेच परिस्थितीमुळे सामान्य माणसाची होणारी कोंडी ,शेतकऱ्यांच्या समस्या यांचे मार्मिक दर्शन घडविते. त्यासोबतच अनेक ज्वलंत विषयावर समाज प्रबोधनही करते. कमीत कमी शब्द आणि रेषांच्या आधारे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे सत्य समाजापुढे मांडण्याचे कार्य व्यंगचित्र करते. व्यंगचित्र जशी अबालवृद्धांना आवडतात तसेच बाळगोपाळही व्यंगचित्रांच्या मेजवानीचा उत्साहाने आनंद घेतात.
         व्यंगचित्र ही कला आहे, ती आत्मसात करणे आणि तिची जोपासना करणे या दोन्ही गोष्टी कष्टसाध्य आहेत .याच्या शिक्षणाचे धडे कोणत्याही शाळा कॉलेजातून दिले जात नाहीत म्हणून भाराभर व्यंगचित्रकार निर्माण होत नाहीत. यात मराठी व्यंगचित्रकारांची संख्या जेमतेम ८० ते ९० च्या दरम्यान आहे. आहेत त्यांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळत नाही, त्यामुळेच व्यंगचित्रकार पूर्णवेळ पेशा बनविणे कठीण होऊन बसले आहे. ही कला अबाधित राहण्यासाठी व्यंगचित्रकारांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
         व्यंगचित्र आणि वाचकांचे नाते शतकानुशतके आहे .पानभर लेख लिहून जो परिणाम होत नाही तो एका व्यंगचित्राने साधल्याची अनेक उदाहरणे आहेत.
            जगभर ५ मे हा "व्यंगचित्र दिन" म्हणून साजरा केल्या जातो. १८९५ मध्ये याच दिवशी जोसेफ पुलित्झर यांच्या न्यूयॉर्क वर्ल्ड मध्ये हास्य आणि व्यंग यांची उधळण असलेल्या ' द यलो कीड ' या काॅमिक्सचे प्रकाशन झाले होते. निर्माते होते रिचर्ड एफ. आऊटकल्ट ' द येलो किड ' ला वर्तमान युगातील व्यंगचित्रांचा प्रारंभ मानला जातो. व्यंगचित्र ही विनोदीच असते असे नव्हे तर ते मार्मिक, प्रबोधनात्मक ,बोचरे वगैरे सुद्धा असतात. मराठी व्यंगचित्र कला क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे, सि.द. फडणीस, वसंत सरवटे, वसंत हळबे, प्रभाकर ठोकळ, मंगेश तेंडुलकर ,विकास सबनीस ,ज्ञानेश सोनार यांसारखी अनेक नामवंत व्यंगचित्रकार मंडळी वेगवेगळ्या शैलीत वाचकांना हसवत व अंतर्मुख करत,त्यांचाच वारसा पुढे जपण्याची आजची व्यंगचित्रकार मंडळी प्रयत्न करीत आहे.
            विनोद बुद्धी ,वाचन क्षमता ,या सोबतच चित्रकलेचा थोडासा गंध तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या भावनेला, मनातल्या विचाराला, विनोदबुध्दीला कागदावर उतरवा. मराठी व्यंगचित्रकारांची बोटावर मोजण्याएवढी ही जमात येत्या काळात आणखीन वाढो,प्रगल्भ होवो, जागतिक व्यंगचिञ दिनानिमित्त दिनांक ५ व ६ मे २०२४ रोजी नवी मुंबईतील वाशी येथील साहित्य मंदिर येथे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या कार्टूनिष्टस कम्बाईन संघटनेतर्फे कार्टून महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.